आधी सापळा, अन् मग मध्यरात्री जोरदार धाड!....मालवणात पोलिसांचा हल्लाबोल; ८० दारूचे बॉक्स जप्त

आधी सापळा, अन् मग मध्यरात्री जोरदार धाड!....मालवणात पोलिसांचा हल्लाबोल; ८० दारूचे बॉक्स जप्त

मालवण 
 

   मालवण शहरात अवैध दारू तस्करी आणि विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा तीव्र बडगा उगारला आहे. शहरातील दांडी भागात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ८० बॉक्स जप्त करण्यात आले असून या जप्त साठ्याची बाजारातील किंमत सुमारे ५ लाख ३८ हजार रुपये आहे. शनिवारी, ३१ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा ही धाड टाकण्यात आली. या प्रकरणी बेकायदेशीर दारूसाठा बाळगल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे तालुक्यातील बेकायदेशीर दारू व्यावसायिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांनी या धडक मोहिमेचे नेतृत्व केले. दांडी परिसरात बेकायदेशीर मद्यसाठा ठेवल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून ही कामगिरी पार पाडली. या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, तसेच पोलीस हवालदार सुहास पांचाळ व सुप्रिया पवार यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. मालवण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर गोवा दारूचा साठा पकडला गेल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास मालवण पोलीस करत आहेत.