शिक्षिका प्रियांका वरक यांना शासनाचा ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर

शिक्षिका प्रियांका वरक यांना शासनाचा ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर

वेंगुर्ला 

   राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आडेली, जांभरमळा येथील सहाय्यक शिक्षिका प्रियांका धोंडी वरक यांना प्रतिष्ठेचा 'आयडॉल शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य शाळा आणि विद्यार्थी विकासासाठी समर्पित करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने शासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. अशा शिक्षकांचे अनुभव राज्यातील इतर शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत पोहोचावेत, तसेच राज्यातील शिक्षकांना शैक्षणिक कार्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या मोहिमेमागील प्रमुख हेतू आहे. प्रियांका वरक यांना शिक्षण क्षेत्रातील १८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, गेल्या १० वर्षांपासून त्या वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आडेली, जांभरमळा येथे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन त्यांना आयडॉल शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून, सहकारी शिक्षकांकडून, पालकांकडून तसेच परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.