विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट.... फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांचे अर्ज आता नियमित शुल्काने ३० नोव्हेंबरपर्यंत भरता येणार

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट.... फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांचे अर्ज आता नियमित शुल्काने ३० नोव्हेंबरपर्यंत भरता येणार

सिंधुदुर्गनगरी

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि बारावी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षांच्या ऑनलाईन आवेदनपत्र (परीक्षा अर्ज) भरण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यभरातील दुष्काळी परिस्थितीची गंभीर दखल घेत शिक्षण मंडळाने कोणत्याही प्रकारचे विलंब शुल्क किंवा अतिविलंब शुल्क न आकारता, सर्व अर्ज नियमित शुल्काने स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या वेळापत्रकानुसार, नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत किंवा तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी तसेच आयटीआयमधून 'ट्रान्सफर ऑफ क्रेडिट' घेणारे सर्व विद्यार्थी आता रविवार, १ नोव्हेंबर २०२६ ते सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज भरू शकतील. सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या विहित मुदतीत विद्यार्थ्यांचे शुल्क ऑनलाईन जमा करणे बंधनकारक आहे. तसेच, शुल्क भरल्याची पावती आणि विद्यार्थ्यांच्या अर्जांची 'प्रि-लिस्ट' संबंधित विभागीय मंडळाकडे सोमवार, ७ डिसेंबर २०२६ पर्यंत जमा करणे आवश्यक असणार आहे. आवेदनपत्र भरताना तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्ज भरण्यापूर्वी 'कॉलेज/स्कूल प्रोफाईल' मधील संस्थेची माहिती, मान्यताप्राप्त विषय आणि शिक्षकांची तपशीलवार माहिती अचूकपणे भरून मंडळाकडे पाठवणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर मिळणाऱ्या प्रि-लिस्टची प्रिंट काढून शाळांनी ती विद्यार्थ्यांच्या जनरल रजिस्टरनुसार काटेकोरपणे पडताळावी. माहितीची खात्री पटल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेणे आणि शाळाप्रमुख अथवा प्राचार्यांनी प्रत्येक पानावर शिक्क्यासह सही करणे बंधनकारक आहे. यापूर्वीच विभागीय मंडळांमार्फत परीक्षांच्या अर्जाबाबतच्या सर्व सविस्तर सूचना शाळांना कळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून, यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे सर्व संबंधित विद्यार्थी, पालक तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतीही दिरंगाई न करता निर्धारित वेळेतच आपली आवेदनपत्रे सादर करावीत, असे आवाहन शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.