३४ वर्षांच्या सेवेनंतर प्रा. अरविंद बिराजदार सेवानिवृत्त....खर्डेकर महाविद्यालयात गौरव सोहळा, विद्यार्थ्यांना दाखवला स्वावलंबनाचा मार्ग

३४ वर्षांच्या सेवेनंतर प्रा. अरविंद बिराजदार सेवानिवृत्त....खर्डेकर महाविद्यालयात गौरव सोहळा, विद्यार्थ्यांना दाखवला स्वावलंबनाचा मार्ग

वेंगुर्ला


       बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथील उद्यानविद्या विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक अरविंद कल्लाप्पा बिराजदार हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त महाविद्यालयात गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी होते. यावेळी प्रा. बिराजदार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचारी, व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनेही त्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर, जि.प. सदस्य संजय गावडे, निवृत्त अभियंता अनिल जाधव, कवी वीरधवल परब, पत्रकार महेंद्र मातोंडकर, नगरसेवक प्रशांत आपटे, माजी मुख्याध्यापक दादा सोकटे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, विद्यार्थी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा. बिराजदार यांचा जन्म १२ जून १९६८ रोजी झाला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत त्यांनी "कमवा आणि शिका" योजनेच्या मदतीने खर्डेकर महाविद्यालयातून बारावी केली. ३ जुलै १९९२ रोजी त्यांनी याच महाविद्यालयात सेवेला सुरुवात केली.सेवाकाळात त्यांनी उद्यानविद्या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कृषी विषयाची आवड निर्माण केली. नर्सरी व्यवसाय, कलम बांधणी, फळबाग विकास, आंबा, मिरी, दालचिनी लागवडीचे प्रशिक्षण देऊन अनेक विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवले. नोकरीसोबतच त्यांनी एम.एस्सी. पर्यावरणशास्त्र आणि एलएलबी या पदव्या संपादन केल्या. स्पर्धा परीक्षा व करिअर नियोजनाबत केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत आहेत.मान्यवरांनी आपल्या मनोगतात प्रा. बिराजदार यांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमाचा गौरव केला.उत्तरादाखल बोलताना प्रा. बिराजदार यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, कुटुंब, प्राचार्य एम. एच. कदम, सहकारी आणि शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांना दिले. "खर्डेकर महाविद्यालयाने माझे आयुष्य घडवले, या संस्थेचे ऋण आयुष्यभर राहील" अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले तर आभार डॉ. डी. एस. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास त्यांच्या पत्नी विरश्री, कन्या प्रीती आणि सुपुत्र प्रबल बिराजदार उपस्थित होते.