वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल यांचे निधन

वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल यांचे निधन

वेंगुर्ला

 

      वेंगुर्ले येथील माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शिवाजी रमाकांत कुबल यांचे काल वृद्धापकाळाने वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. ते कुबलवाडा येथील रहिवासी होते.त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कुबल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे मित्र आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे मार्गदर्शक मानले जात. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी ते वेंगुर्ले नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष बनले होते. त्यांच्या काळात वेंगुर्ला नगरपालिकेला स्वच्छता अभियानात महत्त्वाचा पुरस्कार मिळाला होता.शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना राज्य शासनाचा कृषिभूषण आणि कृषिरत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी दापोली कोकण कृषी विद्यापीठात सुमारे १५ ते २० वर्षे सिनेट सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच वेंगुर्ल्यातील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या स्थानिक संचालक मंडळातही ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाने वेंगुर्ल्याने एक अभ्यासू आणि आदराचे स्थान असलेले नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या पश्चात पुतणे, पुतण्या, भावजया आणि नातवंडे असा परिवार आहे.