दोडामार्ग येथे दोन सॉमिलवर वनविभागाची कारवाई
दोडामार्ग
अवैध्य लाकूड साठा आढळल्या प्रकरणी दोडामार्ग तालुक्यातील दोन सॉमिलवर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली. तसेच हे दोन्ही सॉमिल सील करून संबंधित मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सॉमिल धारकांचे धाबे दणाणले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे दशक्रोशी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इको सेन्सिटिव्ह झोन लागू करण्यात आला आहे. मात्र या परिसरात अवैध वृक्षतोड सुरूच आहे. वृक्षतोड झाल्यानंतर लाकूड साठा तालुक्यातील काही सॉमिल वर पाठवला जात असल्याची तक्रार सावंतवाडी येथे वन विभागाच्या कार्यालयात देण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक वनसंरक्षक वैभव गोराटे, दोडामार्ग वनपरीक्षेत्र अधिकारी वैशाली मंडल व त्यांचे पथक मणेरी येथील आशापुरा स्वामील व शहरातील धाटवाडी येथील सातेरी सॉमिल वर तपासणी साठी गेले असता तपासणी दरम्यान त्यांना दोन्ही ठिकाणी परवाना व्यतिरिक्त अवैध्य लाकूड साठा आढळून आला. अवैध्य लाकडाचे मोजमाप करून दोन्ही सॉमिल सील करण्यात आल्या आहेत.