मठ कणकेवाडी नं. ३ शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात
वेंगुर्ला
मठ कणकेवाडी नं. ३ (ता. वेंगुर्ला) येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेला दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने तसेच टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे उपशिक्षक तथा मुख्याध्यापक श्री. पोळजी यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व, वारीची परंपरा आणि तिच्यामागील सामाजिक मूल्ये याविषयी मार्गदर्शन केले.यानंतर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक वेष परिधान करून उत्साहात दिंडी काढली. मुलांनी धोतर, कुर्ता, फेटा, तर मुलींनी नऊवारी साडी आणि तुळशी वृंदावनासह वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले. अभंग, भजने आणि "विठ्ठल-रुक्मिणी"च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी श्री. लालाजी मंदिरापर्यंत पायी दिंडी काढत भक्तिमय वातावरण निर्माण केले.या सोहळ्यास शाळेतील शिक्षक श्री. भोई, सौ. घोरपडे तसेच पालक श्री. देऊ परब, सौ. जयश्री सकपाळ, सौ. ईशा गावडे, कु. चांदणी भगत यांच्यासह अनेक पालक, ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.सोहळ्यानंतर श्री. देऊ परब यांच्या वतीने उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना खाऊचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याचे ग्रामस्थ आणि पालकांकडून कौतुक करण्यात आले.
konkansamwad 
