सावंतवाडीच्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सावंतवाडीच्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सावंतवाडी 

 


        शहरातील बहुचर्चित ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून, ठेकेदार आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा स्पष्ट अभाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज सावंतवाडी नगरपरिषदेला भेट देऊन एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. तसेच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाचा आढावा घेतला. या योजनेचे 'थर्ड पार्टी ऑडिट' करण्यात आले असून, त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. हा रिपोर्ट नगरपरिषदेच्या आगामी सभेत सादर केला जाणार असून, करारानुसार काम न झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट माहिती जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिली.या बैठकीप्रसंगी माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले आणि उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी योजनेतील त्रुटींविषयी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. आज झालेल्या स्थळ पाहणी दरम्यान स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनीही कामातील अनेक गंभीर तुटींवर बोट ठेवले. मुळात ज्या गतीने हे काम होणे अपेक्षित होते, त्या गतीने ते झालेले नाही. प्रशासकीय कालखंडात या कामात ज्या चुका झाल्या आहेत, त्या सर्वांची चौकशी लावून दोषींवर शंभर टक्के कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. कामात पारदर्शकता राहावी यासाठी नगरसेवक, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले जाणार आहे.सध्या प्राप्त झालेला ऑडिट रिपोर्ट लवकरच नगरपालिकेच्या कॉन्सिलसमोर (सभेसमोर) ठेवण्यात येईल. कराराचा भंग किंवा कामात कसूर आढळल्यास ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याचे सर्वस्वी अधिकार नगरपालिकेकडे आहेत. उपनगराध्यक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्‌द्यानुसार, रस्त्यांच्या कामात हॉट मिक्स ऐवजी कोल्ड मिक्सचा वापर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठेकेदाराची बिले अदा करताना नेमकी काय प्रक्रिया राबवली गेली, याचीही सखोल तपासणी केली जाईल. ही संपूर्ण योजना गुरुत्वाकर्षणावर (ग्रॅव्हिटी) आधारित असल्याने, त्याद्वारे शहराला शंभर टक्के पाणीपुरवठा व्हावा आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकडे प्रशासन शेवटपर्यंत बारकाईने लक्ष ठेवणार आहे. ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी साधारणतः आणखी एका वर्षाचा कालावधी लागणार आहे.याशिवाय, शहरातील योगा सेंटरच्या कामाच्या भागातून जाणारी नरेंद्र डोंगरावरील नळपाणी योजनेची पाईपलाईन दुसऱ्या मार्गाने हलवण्यासाठी स्वतंत्र निधी दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात झाडे पडून वीजवाहिन्या तुटल्याने निर्माण झालेल्या समस्येवरही मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, आंबोली घाटात शनिवार आणि रविवार होणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवरही या बैठकीत चर्चा झाली. यावर उपाय म्हणून पर्यटकांना विशेष वाहनातून धबधब्याच्या परिसरात सोडण्यासाठी वन विभागाला अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच वीकेंडला आंबोली परिसरात जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी केली जाईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. या बैठकीला नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.