वेंगुर्ला भटवाडी घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून छडा....मुंबई-ठाण्यातून आरोपी गजाआड
वेंगुर्ला
वेंगुर्ला भटवाडी येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत उघड केला आहे. गुन्ह्यातील आरोपी बासेरुल गुलमोहर शेख, वय 45, मूळ राह. वेस्ट बंगाल, सध्या राह. शांतीनगर झोपडपट्टी, कळवा याला मुंबईतील कुर्ला झोपडपट्टी येथून ताब्यात घेण्यात आले.वेंगुर्ला पोलिस ठाण्यात गुर.नं. 111/2026 भा.न्या.सं. कलम 305, 331(3), 331(4), 62 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यापासून आरोपी आपले वास्तव्य लपवून ठेवत होता. तो रेल्वेने वेस्ट बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. दि. 21/06/2026 रोजी पथकाने सापळा रचून कुर्ला झोपडपट्टी, मुंबई येथून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वेंगुर्ला भटवाडी येथील घरफोडीचा गुन्हा कबूल केला. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी त्याला वेंगुर्ला पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार डॉमिनिक डिसोझा, जॅक्सन घोन्सालवीस, ज्ञानेश्वर तवटे आणि पोलीस शिपाई अमर कांडर यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. गुन्हे अभिलेख तपासणीत आरोपी बासेरुल शेख याच्याविरुद्ध लखनऊ, वेस्ट बंगाल व इतर राज्यांमध्ये घरफोडी व चोरीचे गुन्हे यापूर्वी दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
konkansamwad 
