देवगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांचे निधन

देवगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले यांचे निधन

देवगड


  तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरवणारी घटना सोमवारी घडली. देवगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार दयानंद यशवंत मांगले यांचे सोमवारी 13 जुलै रोजी वयाच्या 58 व्या वर्षी चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.  दयानंद मांगले यांनी अनेक वर्षे निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे पत्रकारिता करत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे, सामाजिक बांधिलकीमुळे आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या दिलदार स्वभावामुळे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रासह समाजातही वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यांच्या निधनाची बातमी समजताच पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. "दिलदार मित्र हरपला" अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.त्यांच्या पश्चात भाऊ, पुतणा, पुतणी, बहीण, भावोजी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे देवगडच्या पत्रकारितेत निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नसल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण कायम प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात येत आहे.