लोकांना सन्मान देणे, भारत देश म्हणून एकत्र पद्धतीने पुढे जाणे हा स्तुत्य हेतू : आ.नितेश राणे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारकडून 'मेरी माटी, मेरा देश' अभियान.
कणकवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेरा माटी मेरा देश' हे अभियान सुरू केले आहे. आपण सर्व विविध गावातील नागरिक असलो तरी भारत देश म्हणून एकत्र असणार आहोत. ज्या मातीतून आपण जन्म घेतला, जी आपली कर्मभूमी आहे त्या मातीतील लोकांना सन्मान देणे, भारत देश म्हणून आपण एकत्र पद्धतीने पुढे जाणे हा स्तुत्य हेतू 'मेरी माटी मेरा देश' या अभियाना मार्फत देण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान सर्वांना देण्यात आलेली पंचप्राण शपथ ही प्रत्येकाने आत्मसात करून गावाला लोकप्रतिनिधी म्हणून अथवा देशाचा सुजान नागरिक म्हणून पुढे नेत असताना प्रत्येक क्षणाला त्या शपथीची आठवण झाली पाहिजे, असे प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारकडून 'मेरी माटी, मेरा देश' हे अभियान राबविण्यात आले. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व गावे व शहरांतील माती अमृत कलशात संकलित करून पुढे दिल्ली येथे या मातीचा वापर करून शूरवीरांच्या स्मरण प्रीत्यर्थ 'अमृत वाटिके'ची निर्मिती केली जाणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सोमवारी कणकवली पंचायत समिती मार्फत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या अमृत कलश यात्रेची सांगता आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी आ. प्रमोद जठार, भाजपा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी सभापती मनोज रावराणे, माजी उपसभापती प्रकाश पारकर, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, जि. प. चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. काळे, जि. प. ग्रा.पं. विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, माजी जि. प. सदस्य संजय देसाई, बाळा जठार, कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांच्यासह पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली तालुक्यातील ६३ गावांमध्ये १०६ महसुली गावे आहेत. या गावांमधील माती पंचायत समिती येथे एकत्रित करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत ढोल ताशाच्या गजरात गावामध्ये संकलित केलेली मातीचा कलश आणण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रशालेतील विद्यार्थ्यांमार्फत स्वागत गीत व पथनाट्य सादर करण्यात आले, तसेच वारकरी संप्रदायाचे दिंडीचे सादरीकरण केले. तर तळेरे हायस्कूलचा विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. अशा प्रकारच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पंचायत समिती पर्यंत ढोल ताशाच्या गजरात अमृत कलश यात्रा काढण्यात आली. त्यानंतर सर्व गावातील माती पंचायत समिती येथे एका कलशांमध्ये एकत्रित करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी मानले.