दोडामार्ग येथे अजगराने कुत्र्यासह पिल्लांना गिळले
दोडामार्ग
तालुक्यातील मोर्ले येथील एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे.मोर्ले येथील रहिवासी पंकज गवस यांच्या मांगरात एक पाळीव कुत्रा आणि तिची चार लहान पिल्ले राहत होती. रात्रीच्या सुमारास एका उपाशी असलेल्या १५ फुटी अजगराची नजर या कुत्र्यांवर पडली. या अजगराने मांगरात शिरून त्या ठिकाणी असलेल्या मोठ्या कुत्र्याला आणि तिच्या चारही पिल्लांना एकापाठोपाठ एक गिळंकृत केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भक्ष्य फस्त केल्यामुळे अजगराला हालचाल करणे कठीण झाले आणि तो त्याच मांगरात पडून राहिला.नेहमीप्रमाणे सकाळी पंकज गवस हे मांगराच्या परिसरात आले असता, त्यांना कुत्र्याची पिल्ले कुठेच दिसली नाहीत. त्यांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली असता मांगराच्या एका कोपऱ्यात त्यांना एक भला मोठा, सुजलेल्या अवस्थेतील अजगर आढळून आला. अजगराचे पोट फुगलेले असल्याने त्याने काहीतरी मोठे भक्ष्य गिळल्याचे पंकज यांच्या तात्काळ लक्षात आले.या घटनेची माहिती मोर्ले गावात वाऱ्यासारखी पसरली आणि अजगराला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने वनविभागाला याची कल्पना देण्यात आली. वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत शिताफीने या १५ फुटी अजगराला सुरक्षितपणे पकडले. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या अजगराला जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
konkansamwad 
