कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध एसटी कर्मचारी संघाचा उपोषणाचा इशारा.

सेवा शक्ति संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या आगार कार्यकारणीने २६ जानेवारी रोजी वेंगुर्ला आगार येथे उपोषणाचा इशारा दिला. वेंगुर्ला आगारातील वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांचा मनमानी कारभार वेळोवेळी आगार व्यवस्थापक यांच्या निदर्शनास आणून देखील त्यावर आगार व्यवस्थापक यांनी कोणतीही दखल न घेतल्याने सेवा शक्ति संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या आगार कार्यकारणीने २६ जानेवारी २०२५ रोजी आगाराच्या गेटवर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन आगार व्यवस्थापक यांना दिले. कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी होणारा अन्याय, कर्मचाऱ्यांना देण्यांत येणारी उद्धट वर्तणूक, चुकीच्या पद्धतीने करण्यात येणारी प्रशासकीय कामे, चुकी नसतानाही कर्मचाऱ्यांना देण्यांत येणारी आरोप पत्रे, कर्मचाऱ्यांना धमकावणे यामुळे कर्मचारी काम करण्याच्या मानसिकतेत नसून सदर वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांची तात्काळ आगारातून बदली करण्यात यावी अन्यथा सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी सेवा शक्ति संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे विभागीय सचिव श्री भरत चव्हाण, विभागीय सहसचिव श्री स्वप्निल रजपूत, आगार सचिव श्री दाजी तळवनेकर, आगार उपाध्यक्ष श्री सखाराम सावळ, श्री अनंत झोरे, श्री महादेव भगत, श्री ए.एम.नाईक, अक्षय येसाजी, रामदास केदार इतर पदाधिकारी उपस्थित होते.