माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलासह कुटुंबावर सुनेचा छळ आणि जादूटोण्याचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलासह कुटुंबावर सुनेचा छळ आणि जादूटोण्याचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

सिंधुदुर्ग

 

      माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलासह त्यांच्या कुटुंबावर आणि काही भोंदू बाबांवर सुनेचा शारीरिक, मानसिक छळ करणे तसेच जादूटोणा केल्याप्रकरणी मुंबईतील विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांचे चिरंजीव नगरसेवक गितेश राऊत यांच्या पत्नी गिरीजा गितेश राऊत यांनी दिलेल्या सविस्तर जबाबावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या हाय-प्रोफाइल प्रकरणामुळे संपूर्ण कोकणासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, विवाह जुळवताना मुंबईत स्वतःचा बंगला आणि आलिशान फ्लॅट असल्याचे खोटे सांगून फसवणूक करण्यात आली. मात्र, लग्नानंतर वास्तव समोर आल्यावर याबाबात जाब विचारला असता पीडितेला अत्यंत उर्मटपणे वागणूक देऊन धमकावण्यात आले. लग्नानंतर विविध देशांत फिरण्यास गेले असता पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली आणि विचारणा केली असता अमानुष मारहाण केली. पतीचे नपुंसकत्व लपवण्यासाठी सासरच्या मंडळींनी संगनमत करून विवाहितेला 'बाहेरची बाधा' असल्याचे भासवण्यास सुरुवात केली आणि अघोरी प्रकारांचा अवलंब केला. सासरच्यांच्या सांगण्यावरून विवाहितेला मुंबईतील कुर्ला येथील एक मुस्लिम बाबा, भांडुपचे आबा राऊत, कोलगाव सावंतवाडी येथील फिरोज बाबा, करूळ घाट राजापूर येथील काझी बाबा आणि नानेली कुडाळ येथील हरिश्चंद्र घाडी अशा वेगवेगळ्या भोंदू बाबांकडे नेण्यात आले. तेथे तिच्यावर लिंबू कापणे, काळ्या कणकेच्या बाहुल्या, टाचण्या टोचणे, अंगारे-धुपारे, जिवंत कोंबडा अंगावरून उतरवणे, केस उपटणे आणि गोमूत्र पिण्याची सक्ती करणे यांसारखे अघोरी व अमानुष प्रकार सातत्याने करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यांना आणि उपचारांना पतीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. उलट, माजी खासदारांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून डॉक्टरांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पीडितेने केला आहे. पतीने नैसर्गिक गर्भधारणेचे पर्याय नाकारून विवाहितेवर घरच्या घरी "होम इन्सेमिनेशन" करण्याची प्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला व मानसिक छळ केला. तसेच, राजकीय कार्यक्रमांमध्ये अडचण येऊ नये म्हणून मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यास जबरदस्ती करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या सविस्तर जबाबाच्या आधारे पोलिसांनी पती गितेश विनायक राऊत, सासरे विनायक राऊत, सासू शामल विनायक राऊत, लग्न जुळवणारे सुरेखा राजेश सरफरे व राजेश सरफरे, चुलत सासरे आबा राऊत, तसेच फिरोज बाबा (सावंतवाडी), काझी बाबा (राजापूर) आणि हरिश्चंद्र घाडी (कुडाळ) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून एका मोठ्या राजकीय कुटुंबाशी संबंधित हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र याची जोरदार चर्चा सुरू आहे.