सिंधुदुर्गात वळवामुळे आंबा, काजू, कोकम पीक धोक्यात

सिंधुदुर्गात वळवामुळे आंबा, काजू, कोकम पीक धोक्यात

 

सिंधुदुर्ग 


       शुक्रवारी जिल्हाभरात मेघगर्जनेसह वळवाच्या सरी कोसळल्या. सकाळी तसेच दुपारच्या सत्रात शहर व परिसरात रिमझिम पाऊस झाला, तर ग्रामीण भागात सरी बरसल्या. या पावसाने अंतिम टप्प्यातील आंबा, काजू, कोकम पिकासह फळांचे नुकसान झाले आहे. मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढे सरकला आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वळीव पाऊस कोसळला. सकाळच्या सत्रात शहर परिसरात पावसाचा हलकासा शिडकाव झाला. डिगस पंचक्रोशीसह ग्रामीण भागात पावसाची सर बरसली. ऊन व पावसाचा खेळ या भागात सुरू होता. दुपारी अडीच वाजल्यापासून कुडाळ शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पावसाने रस्ते निसरडे बनले होते. यामुळे पादचारी, दुचाकीधारकांची कसरत होत होती. पावसाळी हंगामाच्या तयारीत शेतकरी गुंतले आहेत. मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. शेतीच्या मशागतीची कामे जोरात चालू आहेत. मान्सून दाखल होताच शेतीच्या कामांना वेग येणार आहे. सध्या घरे दुरूस्ती, छप्पर साफसफाई, पावसाळी बेगमीची कामे चालू आहेत.गेले आठ दिवस जिल्ह्यात दररोज अवकाळी पाऊस बरसत आहे. या पावसामुळे शेवटच्या टप्प्यात असलेले आंबा, काजू, कोकम पिकाचे नुकसान होत आहे.