सिंधुदुर्गात २७ हजार बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण २७ हजार ८०६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात ९०४ लसीकरण केंद्रे, ८० मोबाईल पथके आणि ४३ ट्रान्झिट पथके सज्ज करण्यात आली आज या व्यापक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे बालकाला लस पाजून करण्यात आला. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील २४९ उपकेंद्रे, ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११ उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांची यंत्रणा प्रभावीपणे राबविली जात आहे. विशेष म्हणजे दुर्गम भाग, स्थलांतरित कुटुंबे, वीटभट्ट्या आणि बांधकामस्थळांवरील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. भारत देशाला मिळालेला पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी पाच वर्षांखालील कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी सर्व पालकांना केले. आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व बूथवर लसीकरणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
konkansamwad 
