मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल.

मुंबई.
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील उच्चभ्रू लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आज गुरूवारी भीषण आग लागली आहे. कॉम्प्लेक्समधील ग्राऊण्ड प्लस एक मजली बंगल्यात ही आग भडकली.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील स्टेलर बंगले येथील क्रॉस रोड क्रमांक दोनवर बंगला क्रमांक ११ मध्ये आग लागल्याची माहिती मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
गुरुवारी सकाळी ८ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. ही लेव्हल १ आग म्हणून घोषित करण्यात आली आहे. आग सुरुवातीला तळ मजल्यावर लागली. नंतर ती पहिल्या मजल्यावर पसरत गेली. मुंबई अग्निशमन दल, एक रुग्णवाहिका, अदानी वीज वितरणचे कर्मचारी आणि मुंबई महापालिका अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत" अशी माहिती बीएमसीने दिली. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.