बारावी आयएससी निकाल रखडल्याने पालकांचा उद्रेक.... कायदेशीर लढ्याचा इशारा
कणकवली
हुंबरठ येथील बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूल च्या बारावी आयएससी परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि निकालातील विलंबामुळे संतप्त झालेल्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी गुरुवारी शाळेवर धडक देत संस्थाचालकांना जाब विचारला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर 10 पैकी 5 विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचे दाखले घेतले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप करत मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने दिला आहे.आयएससी बारावी परीक्षेला बसलेल्या 10 विद्यार्थ्यांचा निकाल परीक्षा होऊन 35 दिवस उलटूनही जाहीर झालेला नाही. 3 जून रोजी निकाल देण्याचे आश्वासन शाळेने दिले होते. मात्र 4 जूनला पुन्हा दोन दिवसांची मुदत मागण्यात आली. निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण, प्रवेश प्रक्रिया व स्पर्धा परीक्षांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. कणकवली पंचायत समितीच्या सभेतही हा मुद्दा गाजला होता. पं. स. सदस्य लक्ष्मण गावडे यांनी आरोप केला की, "बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण न करताच परीक्षा घेतली गेली. परीक्षेदरम्यान फळ्यावर लिहिलेली उत्तरे उतरविल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सारख्याच आहेत." विस्तार अधिकाऱ्यांकडून चौकशी करून अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिली.विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले की, "संस्थाचालकांनी आपल्या नातेवाईकांना गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळावे यासाठी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मागे असलेल्या फळ्यावर उत्तरे लिहिली जात होती. संबंधित विद्यार्थ्याला स्वतंत्र खोलीत बसवून मदत पुरविली जात होती. फक्त 50% अभ्यासक्रम शिकवून उर्वरित ऑनलाइन पूर्ण करण्यास सांगितले. प्रश्न विचारल्यावर धमक्या दिल्या." 'दाखले द्या, दुसरीकडे प्रवेश घेतो' - पालकांची भूमिका ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक म्हणाले, "प्रशालेची चूक असल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न झाले आहे. 3 जूननंतरही निकाल न दिल्यास नुकसान भरून देण्याची लेखी तयारी संस्थाचालकांनी दर्शवली होती." पालक किशोर ठाकरे, कालिदास परब यांनी, "आमच्या मुलांची कागदपत्रे परत द्या. आता आश्वासनांची गरज नाही," अशी ठाम भूमिका घेतली.संस्थेचे सचिव विवेक विजयकर यांनी आणखी दोन दिवस प्रतीक्षा करण्याची विनंती केली, मात्र पालक ठाम राहिल्याने 5 विद्यार्थ्यांना दाखले देण्यात आले.विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी व जबाबदारांवर कारवाईसाठी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करून कायदेशीर लढा उभारला जाणार असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. यावेळी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, कणकवली तालुका अध्यक्ष मंगेश चव्हाण, सदस्य कीर्ती आंबेडकर, पं. स. सदस्य लक्ष्मण गावडे उपस्थित होते.
konkansamwad 
