सावंतवाडी वन विभागातर्फे पर्यावरण सप्ताह उत्साहात.....५००० रोपांची लागवड, नरेंद्र डोंगर येथे ५० पोती प्लॅस्टिक जमा

सावंतवाडी वन विभागातर्फे पर्यावरण सप्ताह उत्साहात.....५००० रोपांची लागवड, नरेंद्र डोंगर येथे ५० पोती प्लॅस्टिक जमा

सावंतवाडी

 

       जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ व वनविभाग सावंतवाडी (प्रादे.) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 जून ते 5 जून या कालावधीत सावंतवाडी वन विभागातील सर्व वन परिक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात पर्यटन स्थळांची साफसफाई, वृक्षलागवड, जनजागृती यांसारखे उपक्रम राबवण्यात आले. पर्यावरण सप्ताहात सावंतवाडी, दोडामार्ग, आंबोली, कुडाळ, कडावल व कणकवली या सहा वन परिक्षेत्रांमध्ये 1500 वडस्टंप लागवड करण्यात आली. तसेच बहुगुणधर्मी व दुर्मिळ औषधी वनस्पती नरक्याच्या 3500 रोपांची लागवड वन विभागामार्फत करण्यात आली.आज दि. 5 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडी वन परिक्षेत्रातील नरेद्र डोंगर वन उद्यान परिसरात प्लॅस्टिक कचऱ्याची साफसफाई व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 50 पोती प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. वन उद्यान परिसरात नरक्या, आवळा, जांभूळ, आंबा या प्रजातींची 20 रोपे लावण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेले सीड बॉल वन उद्यान परिसरात पेरण्यात आले.या कार्यक्रमास उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, पर्यावरणतज्ञ डॉ. जयंत परूळेकर, वनशक्ती फाउंडेशनचे संदीप सावंत, सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार, कोलगाव माध्यमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनक्षेत्रपाल सचिन शिडतूरे, सर्व वनपाल, वनरक्षक, वनसेवक, कार्यालयीन कर्मचारी व पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वन पर्यटन स्थळे प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले.