जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी गोवर्गिय जनावरांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन.

जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी गोवर्गिय जनावरांचे  लसीकरण करुन घेण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

    जिल्ह्यातील गोवर्गिय जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभाग युध्दपातळीवर लसीकरण करत आहे. जिल्ह्यात 70 टक्के जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. ज्या जनावरांचे लसीकरण अद्यापही झालेले नाही त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.
    लम्पी हा विषाणुजन्य रोग असल्याने सन 2023-24 मध्ये साधारणतः जुलै 23 पासून जिल्हयामध्ये लम्पी आजार काही जनावरांमध्ये आढळू लागला. यामध्ये प्रामुख्याने मागील एक  वर्षामध्ये जन्माला आलेली व लसीकरण न झालेल्या जनावरांचा समावेश होता. चालु वर्षामध्ये 1 एप्रिल 2023 पासून आजअखेर 669 जनावरांना या रोगाची लागण झालेली असुन त्यापैकी 372 जनावरे उपचाराने बरी व  28 जनावरांचा मृत्यु झाला आहे. 269 जनावरे सध्या बाधित असुन उपचार सुरू आहेत. चालु वर्षी सुध्दा शासनाने मृत जनावरांसाठी नुकसान भरपाईची तरतुद केली असुन मृत जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यात येईल. चालू वर्षी पुन्हा जिल्ह्यामधील गोवर्गिय सर्व 105000 जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यासठी लस प्राप्त झाली असुन लसीकरणाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. व उर्वरित लसीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. तरी सर्व पशुपालकांना आवाहन करणेत येत आहे की त्यांनी त्यांच्याकडील सर्व गोवर्गिय जनावरांचे लसीकरण करून घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागास सहकार्य करावे तसेच आजारी जनावरांवर उपचार करून घेण्यासाठी नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्याशी संपर्क साधावा.
     संपूर्ण महाराष्ट्रप्रमाणे सन 2022-23 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लम्पी रोग  प्रादुर्भाव झाला. जिल्हातील 2250 जनावरांना 2022-23 मध्ये लम्पीची लागण झाली. यापैकी 2127 जनावरे बरी झाली असून 123 जनावरांचा  मृत्यु झाला.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत जनावरांच्या मालकांना 20.05 लक्ष नुकसान भरपाई देण्यात आली आहे. जिल्ह्यातील गोवर्गिय सर्व 105000 जनावरांचे लम्पी  प्रतिबंधक लसीकरण  करण्यात आले. त्यानंतर लम्पी रोगप्रसार थांबला. असल्याचे  पशुसंवर्धन अधिकारी व जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.