जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे ५०० रोपांची लागवड

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे ५०० रोपांची लागवड

वेंगुर्ले

 

     जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे आज मेजर ध्यानचंद क्रीडांगणाच्या बाजूला कोकम व जांभूळ फळाच्या 500 रोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह उपस्थित नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी 10 रोपे दत्तक घेत वर्षभर त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 
   पुढच्या वर्षीच्या पर्यावरण दिनापूर्वी कृषी तज्ज्ञांमार्फत या झाडांची तपासणी केली जाणार आहे. उत्तम संगोपन करून चांगली वाढ झालेल्या पाच झाडांच्या पालकांना रोख रकमेचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली. 
     नगराध्यक्ष गिरप म्हणाले, "पालिकेला या वर्षभरात 25 हजार रोपांची लागवड करायची आहे. टप्प्या-टप्प्याने वर्षभर ही मोहीम राबवली जाणार आहे. पुढच्या वर्षी पर्यावरण दिनी ही चळवळ नागरिकांसाठी खुली केली जाईल. पालिकेतर्फे सहभागी नागरिकांना पाच रोपे दिली जातील. झाडांचे उत्तम आरोग्य राखणाऱ्या नागरिकांना गौरविण्यात येईल." 
  कॅम्प येथील मेजर ध्यानचंद क्रीडांगणाच्या सभोवतीच्या जागेत ही लागवड करण्यात आली. नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगरसेवक सुषमा प्रभुखानोलकर, शीतल अंगचेकर, प्रणव वायंगणकर, दाजी परब, प्रशांत आपटे, संदेश निकम, रवी शिरसाट, रिया केरकर, आकांक्षा परब, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, सुमन निकम, विनय नेरुरकर, युवराज जाधव, सचिन शेट्ये, काजल कुबल यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले. प्रत्येकाने 10 झाडे दत्तक घेऊन वर्षभर संगोपन करण्याची शपथ घेतली.वेंगुर्ले नगरपरिषदेच्या या 'एक रोप दत्तक योजना'मुळे पर्यावरण संवर्धनाला लोकसहभागाची जोड मिळून शहर अधिक हिरवेगार होण्यास मदत होणार आहे.