मडगाव-एलटीटी दरम्यान धावणार अतिरिक्त स्पेशल गाड्या; चाकरमान्यांना मोठा दिलासा

मडगाव-एलटीटी दरम्यान धावणार अतिरिक्त स्पेशल गाड्या; चाकरमान्यांना मोठा दिलासा

सावंतवाडी

 

      उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) दरम्यान अतिरिक्त समर स्पेशल गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे मुंबई-गोवा प्रवासाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष फेऱ्यांचे नियोजन एप्रिल आणि मे महिन्यासाठी करण्यात आले आहे. या अंतर्गत ट्रेन क्रमांक 01104/01103 ही विशेष गाडी १७ आणि ३० एप्रिल २०२६ रोजी धावणार आहे. ट्रेन क्रमांक 01104 मडगाव येथून सकाळी १०:०० वाजता सुटेल आणि त्याच रात्री १०:०५ वाजता मुंबईत पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात 01103 ही गाडी एलटीटी येथून रात्री १०:५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५० वाजता मडगावला पोहोचेल. तसेच, मे महिन्यातील गर्दीसाठी ट्रेन क्रमांक 01004/01003 ची घोषणा करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01004 मडगाव येथून ७ मे आणि ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६:२० वाजता एलटीटीला पोहोचेल. याच क्रमाने गाडी क्रमांक 01003 एलटीटी येथून ४ मे रोजी सकाळी ८:२० वाजता सुटून रात्री १०:४० वाजता मडगावला पोहोचणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्यांना करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या गाड्यांच्या डब्यांची रचना (कोच कंपोजिशन) एकूण २१ डब्यांची असेल, ज्यामध्ये १ एसी ३-टियर कोच, ११ स्लीपर कोच, ७ जनरल कोच आणि २ एसएलआर डब्यांचा समावेश आहे. कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुकर होणार असून, प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.