राज्यात १५ ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज.

राज्यात १५ ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज.

मुंबई.

  सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. नदी, नाले धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस अधिक झाला आहे. तर 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
   सध्या जरी राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी उद्यापासून म्हणजे 15 ऑगस्टपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो असं हवामान विभागानं सांगितलं आहे. 22 ऑगस्टपर्यंत हळूहळू पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ महिना अखेरपर्यंत चालू राहील अशी माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस अधिक झाल्यानं शेतकरी समाधानी झाले आहेत. तर जादा पावसामुळे काही ठिकाणी शेतकरी अडचणीत देखील आले आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
   कोकण, गोव्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस काही ठिकाणी तर मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संपूर्ण राज्यांमध्ये कुठेही अलर्ट दिलेला नाही.