इन्सुली उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई.......बांदा-दाणोली रस्त्यावर गोवा बनावटी दारूसह ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई.......बांदा-दाणोली रस्त्यावर गोवा बनावटी दारूसह ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

 

 

सावंतवाडी

 

        महाराष्ट्र-गोवा सीमेवरील बांदा-दाणोली रस्त्यावर इन्सुली उत्पादन शुल्कच्या पथकाने मोठी कारवाई केली. यात बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे ६० लाख ०८ हजार २४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राजस्थानमधील कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त राजेंद्र देशमुख आणि सह आयुक्त पी. पी. सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागीय उपआयुक्त विजय चिचलोकर आणि अधीक्षक श्रीमती. किर्ती शेंडगे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार बांदा-दाणोली मार्गावर अवैध दारू वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार हॉटेल सुभेदारच्या समोर सापळा रचण्यात आला.​तपासणी करत असताना पथकाला (एमएच १४ जीयू १२३७) क्रमांकाचा कंटेनर संशयास्पद वाटला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये सिलबंद प्लॅस्टिकच्या २६७ गोणी मिळून आल्या. या गोण्यांमध्ये ३८,४४८ बाटल्या आढळून आल्या. ​या अवैध मद्याची किंमत ४९,९८,२४० इतकी आहे. अवैध मद्य आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर आणि सॅमसंग कंपनीच्या मोबाईलसह एकूण ६०,०८,२४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी कंटेनरचा चालक जसराम (वय २५, रा. शेरपुरा, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई दुय्यम निरीक्षक विवेक कदम, जवान रणजित शिंदे, दीपक वायदंडे, सतिश चौगुले, अभिषेक खत्री आणि सागर सुर्यवंशी यांनी केली.पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत.