राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद

मुंबई
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, श्री. अजित पवार तसेच अन्य मंत्री उपस्थित होते. या निर्णयाबद्दल मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मच्छीमारांच्या नुकसानीची पाहणी आणि तत्काळ मदतीसाठी राणेंची पाठपुरावा
राज्यातील विविध किनारपट्ट्यांवरील मच्छीमारांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी दिल्या होत्या. नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत जाहीर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.यानंतर सततच्या पाठपुराव्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद निश्चित करण्यात आली आहे.या निर्णयामुळे किनारपट्टीवरील हजारो मच्छीमार कुटुंबांना दिलासा मिळणार असून सरकारच्या या पावलाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.