मान्सून केरळमध्ये दाखल; कोकणात पावसाचा इशारा

मान्सून केरळमध्ये दाखल; कोकणात पावसाचा इशारा

मुंबई

 

  राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून अखेर नैऋत्य मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत मान्सूनची वाटचाल वेगाने होण्याची शक्यता असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितले की, मान्सूनने केरळमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला असून पुढील ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.मान्सूनचा प्रभाव वाढत असून उद्या संध्याकाळपर्यंत केरळचा बहुतांश भाग मान्सूनच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून कर्नाटक किनारपट्टीमार्गे उत्तरेकडे सरकणार आहे. सध्या वातावरणीय स्थिती अनुकूल असल्याने मान्सून गोव्याच्या अक्षांशापर्यंत पोहोचण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १० जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोकणातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढू शकते. मात्र, १० जूननंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीचा वेग काहीसा मंदावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पोहोचण्यासाठी २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मान्सूनच्या आगमनामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून राज्यातील शेतकरी आता समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.