डाक विभागाची डाक पेन्शन अदालत ९ ऑक्टोबरला
सिंधुदुर्ग
टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांच्या कार्यालयात शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता डाक पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.टपाल विभागातून निवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी तसेच सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब निवृत्तिवेतनाशी संबंधित प्रकरणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवृत्तिवेतनधारकांच्या तीन महिन्यांच्या आत निकाली न निघालेल्या तक्रारींचा पेन्शन अदालतीमध्ये विचार करण्यात येणार आहे.मात्र, वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढविणे, धोरणात्मक बाबी, शिस्तभंगाची प्रकरणे, डी.पी.सी.च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणे तसेच उत्तराधिकारी व इतर नीतिगत स्वरूपाच्या प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाणार नाही.इच्छुक निवृत्तिवेतनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिक स्वरूपात, इतरांच्या वतीने अथवा एकत्रित स्वरूपात न करता, विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये नंदकुमार कुरळपकर, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी-४१६८१२ या पत्त्यावर दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी. दि. ७ ऑक्टोबरनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाणार नाही.तक्रार अर्जात नमूद करावयाची माहिती : निवृत्तिवेतनधारकाचे/कुटुंब निवृत्तिवेतनधारकाचे नाव, निवृत्ती अथवा मृत्यूच्या वेळीचे पदनाम, संबंधित कार्यालयाचे नाव व निवृत्तीची तारीख, पीपीओ क्रमांक, ज्या पोस्ट ऑफिसमधून पेन्शन घेतली जाते त्या पोस्ट ऑफिसचे नाव, निवृत्तिवेतनधारकाचा पूर्ण पत्रव्यवहाराचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, तक्रारीचा संक्षिप्त तपशील तसेच स्वाक्षरी व दिनांक यांचा समावेश करावा.
konkansamwad 
