ओटवणे देऊळवाडीत शिवभक्तांचा चमत्कार.....एका रात्रीत उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे आमदार राणे-केसरकरांच्या हस्ते दिमाखात अनावरण
ओटवणे
शिवप्रेमींच्या अथक प्रयत्नांतून ओटवणे देऊळवाडी येथे एका रात्रीत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आज आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्याने संपूर्ण ओटवणे गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.याप्रसंगी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, "एका रात्रीत पुतळा उभारून महाराजांबद्दलचे प्रेम व्यक्त करणाऱ्या सर्व शिवप्रेमींचे मनापासून कौतुक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि त्यांच्या वीरतेचा वारसा असाच पुढे चालू ठेवा."
आमदार दीपक केसरकर यांनी गावाच्या विकासाचा मुद्दा मांडला. "ओटवणे गावातील विकासकामांना आपण नेहमीच प्राधान्य देऊ. गावाच्या प्रगतीसाठी आणि विविध समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच तत्पर राहू," अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ओटवणे गावातील प्रतिष्ठित नागरिक, नेते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवभक्तांनी अत्यंत उत्साहाने उभारलेल्या या पुतळ्यामुळे परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
konkansamwad 
