कुडाळात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ.....आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
कुडाळ
एकच ध्यास, हरित कुडाळचा विकास' या टॅगलाईन अंतर्गत आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरात भव्य अशी तब्बल ५ हजार वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिर पासून करण्यात आला. केवळ कुडाळ शहरापुरतीच हि मोहीम राबविण्यात मर्यादीत राहणार नसून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची मोहीम राबविली जाईल असं वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. कुडाळ शहरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हि वृक्षारोपण मोहीम राबविण्याचा संकल्प युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. त्याचा शुभारंभ येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात वृक्षरोपण करून करण्यात आला. यावेळी माजी आमदार तथा ठाकरेसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि इतर पदाधिकारी यांनी विविध रोपांची लागवड मंदिर परिसरात केली. बेल, आवळा, जरुळ, करंज, महोगनी, शेवगा, बहावा, चिंच, कुरुमी, कांचन, पळस इत्यादी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी मंदार शिरसाट राबवित असलेल्या या मोहिमेचे कौतुक केले. आमदार आदित्य ठाकरे हे पर्यावरण प्रेमी आहेत. यांच्या वाढदिवसानिमित्त हि मोहीम राबविण्यात येत आहे. फक्त झाडे लावून हि मोहीम थांबणार नाही तर या झाडांचे संवंर्धन सुद्धा केले जाणार आहे. तसेच लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात हि मोहीम राबविली जाणार असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले. तर मंदार शिरसाट यांनी सांगितले कि आम्ही केलेल्या आवाहनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याचा उपयोग भविष्यात कुडाळ शहरातील भूजल पातळी सुधारण्यासाठी नक्की होईल असा विश्वास मंदार शिरसाट यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह मंदार शिरसाट, अतुल बंगे, गुरु सडवेलकर, योगेश धुरी, कृष्णा धुरी, राजन नाईक, संजय बोभाटे, बबन बोभाटे, संदीप म्हाडेश्वर, तेरसे, भाऊ पाटणकर आदी ठाकरेसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
konkansamwad 
