मुंबई पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते १ डिसेंबर रोजी उद्घाटन.
मुंबई.
मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता ‘प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजने’च्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे येत्या १ डिसेंबर रोजी ताडदेव येथे सकाळी १०.३० आणि वरळी येथे सकाळी ११.३० वाजता कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी माध्यमातून बृहन्मुंबई मधील ताडदेव, वरळी, नायगाव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाईल. आयटी, गारमेंट, ब्युटी ॲण्ड वेलनेस, ऑटोमोटिव्ह ॲण्ड फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील एकूण १० प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. यामध्ये पोलिस आणि पोलिसांच्या कुटुंबातील सदस्य याचा लाभ घेऊ शकतील. किमान ३०० तास ते कमाल ५०० तासांचे कौशल्य प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील महिला, पुरुष आपल्या आधार ओळखपत्राच्या आधारे प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतील. या प्रशिक्षणासाठी एन.आय.सी च्या माध्यमातून बायोमेट्रिक पद्धतीने प्रशिक्षणार्थींची हजेरी घेण्यात येणार आहे. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारास सरकारतर्फे (NSQF) एनएसक्यूएफ स्टॅण्डर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थीला रोजगार संधी, शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध असतील. एखाद्या प्रशिक्षणार्थीला स्वयंरोजगार करावयाचा असल्यास त्याचे मार्गदर्शन करण्यात येईल, सरकारी योजना आणि त्याचे लाभ कसे घ्यावयाचे याचे देखील मार्गदर्शन प्रशिक्षणादरम्यान करण्यात येईल.
१ डिसेंबर रोजी ताडदेव पोलीस वसाहत मैदान, वसंतराव नाईक मार्ग, ताडदेव मुंबई येथे सकाळी १०.३० वाजता आणि मुंबई पोलीस कौन्सिलिंग ॲण्ड प्लेसमेंट सेंटर एल विभाग ३, वरळी येथे सकाळी ११.३० वाजता या कार्यक्रमाचे उदघाटन होईल. या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, आयुक्त डॉ.रामास्वामी एन., सशस्त्र पोलीस दलाच्या अपर पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह, पोलिस सह आयुक्त एस.जयकुमार, मुख्यालयाच्या पोलीस उपआयुक्त डॉ. महेश्वर रेड्डी या उपस्थित राहतील.