दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये अमली पदार्थ व सायबर गुन्हेगारीबाबत मार्गदर्शन संपन्न
वेंगुर्ला
सुरक्षित सिंधुदुर्ग अभियानांतर्गत दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थ व सायबर गुन्हेगारीबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर वेंगुर्ला पोलीस ठाणे आणि MKCL NIKOM Computer यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.शिबिरात वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगितले. व्यसनामुळे शारीरिक, मानसिक व सामाजिक आयुष्य कसे उद्ध्वस्त होते याची माहिती त्यांनी दिली.सायबर गुन्ह्यांबाबत NIKOM Computer चे प्रशांत निकम यांनी मार्गदर्शन केले. मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, ऑनलाइन फसवणूक, ओटीपी-लिंक फसवणूक, सोशल मीडियावरील धोक्यांसह विविध सायबर गुन्ह्यांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.या प्रसंगी शाळेत सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण विभागाच्या फलकाचे अनावरणही पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाभोली इंग्लिश स्कूलमधील RSP विभागामार्फत विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक ज्ञान दिले जाते. अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून होणारे अपघात टाळण्यासाठी RSP हा विषय मार्गदर्शक ठरतो, असे यावेळी सांगण्यात आले. भविष्यात पोलीस विभागाच्या वतीने विविध बंदोबस्ताच्या ठिकाणी RSP विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ट्रॅफिक नियंत्रण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाईल, असेही दाभोलकर यांनी सांगितले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा RSP जिल्हा समादेशक किशोर सोन्सुरकर यांनी शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका रेश्मा चोडणकर, वसंत पवार, होमगार्ड शेटकर उपस्थित होते.
konkansamwad 
