राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलच्या दिया मालवणकरचे यश

चिपळूण
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट, सावर्डे-चिपळूण यांनी डेरवण येथे आयोजित किलेल्या 'डेरवण युथ गेम्स २०२५' या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात वेंगुर्ले येथील जागृती क्रीडा मंडळाची खेळाडू तथा वेंगुर्ले हायस्कूलची विद्यार्थिनी दिया दिलीप मालवणकर हिने लांब उडी व उंच उडी प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.डेरवण येथे सुरू झालेल्या या महोत्सवात राज्यभरातून विविध गटातील खेळाडू सहभागी झाले होते. १२ वर्षाखालील मुलींच्या गटात दिया सहभागी झाली होती. तिने लांब उडी व उंच उडी या दोन्ही प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त करून रजत पदकाची कमाई केली. वेंगुर्ले हायस्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या दियाने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व करत मैदानी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर व संदीप पेडणेकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. डी. कांबळे व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्या या यशाचे कौतुक होत आहे.