दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील रामगड व भगवंतगडावर स्वच्छता मोहीम

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील रामगड व भगवंतगडावर स्वच्छता मोहीम

 

मालवण
 

        किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठानने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रामगड आणि भगवंतगड किल्ल्यांवर पुन्हा एकदा संवर्धन मोहिमेला सुरुवात केली आहे. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर ही मोहीम उत्साहात सुरू करण्यात आली.या मोहिमेदरम्यान दुर्गवीरांनी किल्ल्यावरील बुरुज आणि तटबंदीवर उगवलेली झाडे, गवत आणि अनावश्यक झुडपे काढली. तसेच प्लास्टिकसारखा कचरा गोळा करून किल्ल्याची स्वच्छता केली. मातीखाली गाडल्या गेलेल्या पायऱ्याही बाहेर काढण्यात आल्याने किल्ल्याला पुन्हा मूळ स्वरूप येत आहे. सिद्धनाथ मंदिर परिसरातील गवत काढून मोहिमेची सांगता करण्यात आली. या संवर्धन कार्यात स्थानिक दुर्गवीरांसोबतच रत्नागिरी, रायगड आणि मुंबई विभागातील दुर्गवीरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दुर्गवीर प्रतिष्ठानने यापुढेही अधिकाधिक शिवप्रेमींनी संवर्धन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.