रत्नागिरी जयगड येथे एल.ई. डी. नौकेवर कारवाई ३ ते ४ लाखांची सामग्री जप्त

रत्नागिरी
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या स्पष्ट निर्देशानंतर मत्स्य व्यवसाय खाते अधिक आक्रमक झाले असून अनधिकृत मासेमारीवर कारवाई केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे एल.ई. डी. नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ३ तांडेलांसह अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली असून मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी स्मितल कांबळे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, जयगड) व सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) चे स्वप्निल चव्हाण हे नियमित गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली मोहम्मद हनिफ हसनमिया तांडेल, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी यांची नौका अल-हज-हसन द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात जयगड समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईटव्दारे मासेमारी करत असताना त्यांना पकडण्यात आले. या नौकेवर नौका तांडेलसह 3 खलाशी होते. सदर नौका जप्त करून जयगड बंदरात ठेवण्यात आली आहे. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे देखील जप्त करून ठेवण्यात आली असून अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त केली गेली. स्मितल कांबळे, स्वप्निल चव्हाण, जयगड सागरी सुरक्षा पर्यवेक्षक सुजन पवार व गुहागर सागरी सुरक्षा पर्यवेक्षक विनायक शिंदे आणि सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने सदर कारवाई केली गेली. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे.