वेंगुर्ल्यातील चित्रकला-शिल्पकला नोंदलेखन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले
मराठी भाषेला गतवर्षीच अभिजात मराठीचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता या भाषेची महती सर्वदूर पसरविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मराठी विश्वकोश ही मराठी साहित्य विश्वाला लाभलेली फार मोठी देणगी आहे. १६० पासून मराठी विश्वकोश निर्मितीचे काम सुरू आहे. आत्ताचा जमाना इंटरनेट माध्यमांचा असल्याने मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने वेबसाईडच्या माध्यमातूनही ज्ञानाचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध केला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या संपादक वर्षा देवरुखकर यांनी वेंगुर्ले येथे केले.
अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून वेंगुर्ले नगर पालिकेच्या स्वामी विवेकानंद कौशल्य विकास सभागृहात घेण्यात आलेल्या चित्रकला-शिल्पकला नोंदलेखन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई-सातारा व वेगुर्ज्यातील आनंदयात्री वाङमय मंडळातर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विश्वकोश मंडळाच्या सदस्या प्रा. शरयू आसोलकर, महादेव नाईक, विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्या तथा आनंदयात्री मंडळाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे, नगर पालिकेच्या अधिकारी संगीता कुबल आदी मान्यवर यावेळी व्यासपीठार उपस्थित होते.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विविध ६० विषयांची ज्ञानमंडळे आहेत याद्वारे सातत्याने विश्वकोश अध्ययावत बनविणे व नवीन नोंदी नोंदविण्याचे काम चालते. १९६० मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश निर्मितीला सुरुवात झाली. पुढे या कामाची व्याप्ती वाढल्याने १९८० साली मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्वतंत्र शाखा कार्यान्वित करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत १ ते २० खंड मराठी विश्वकोश मंडळाने मराठी साहित्य विश्वात उपलब्ध केले आहेत. अनेक जिज्ञासू वाचक, अभ्यासक आपले ज्ञान अद्ययावत करण्यासाठी या विश्वकोशांचा संदर्भ घेतात, असे यावेळी बोलताना प्रा. शरयू आसोलकर म्हणाल्या, ही कार्यशाळा वेंगुर्लात होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेल्या विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्य तथा आनंदयात्री वाङमय मंडळाच्या अध्यक्ष वृंदा कांबळी यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागचा उद्देश विशद केला. त्या म्हणाल्या, आपल्या तळकोकणाला कला व साहित्याची फार मोठी परंपरा आहे. आपल्या भागातील या विद्वान मंडळींचीही मराठी विश्वकोशात नोंद व्हावी व या नोंदी लिहिण्याचे कसब आपल्या जिल्हयातील कला व साहित्य क्षेत्रातील जिज्ञासूंना आत्मसाद करता यावे यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. पाद्वारे नवीन संधी उपलब्ध झाली असून या प्रशिक्षण कार्यशाळेतून विश्वकोशातील नोंदी लिहिणारे लेखक तयार होतील अशी आपली अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या विश्वकोश मंडळाचे सदस्य महादेव नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त करून कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ल्यातून उपस्थित राहिलेल्या ४८ मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त केले. त्यानंतरच्या मुख्य सत्रात स्लाईड शोच्या माध्यमातून विश्वकोश मंडळाच्या वाई-सातारा येथील संपादक वर्षा देवरुखकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विश्वकोश मंडळाची स्थापना, कार्य, विस्तार, विविध ज्ञानमंडळे व त्यांचे कार्य याचाबत सविस्तर माहिती देताना चित्रकला शिल्पकला या विषयावरील नोंदीचे महत्वही त्यांनी विषद केले. नेमका हा विषय काय आहे. या विषयावरील कोणत्या नोंदी अपेक्षित आहेत, कोणकोणत्या प्रकारे आपण विश्वकोशासाठी लेखन करू शकतो व त्याद्वारे विश्वकोश निर्मिती मंडळाकडून लेखकांना काय काय फायदे मिळू शकतात याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
विश्वकोशातील नोंदी वाचताना विकिपीडिया किंवा महाजालकावरील तत्सम माध्यमे वाचकांच्या हाताशी असून ते त्यांचाही वापर करू शकतात. त्यामुळे मुद्दधांशी तडजोड न करता सुगम व नेमक्या भाषेत विश्वकोशातील लेखन असावे अशी अपेक्षा आहे. मराठी विश्वकोशाचे सर्व १ ते २० खंड महाजालकावरील https://vishwakosh.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विश्वकोशातील लेखन अद्ययावत माहितीचे वस्तुनिष्ठ, तटस्थ व समतोल असावे. त्यात धर्म-जात-पंथ-लिंग-प्रदेश-पक्ष अशा कोणत्याही निकषावरून पूर्वग्रह नसावा. कोणत्याही बाजूने टोकाची मते नसावीत. नोंदीमधील विधानांचा खरेपणा, बिनचूकपणा याबद्दल लेखकाने विशेष काळजी घ्यावी. संदर्भग्रंथ व माहितीच्या स्रोतांची सूची द्यावी, असेही यावेळी बोलताना देवरुखकर म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदयात्री वाङमय मंडळाचे सचिव प्रा. सचिन परुळकर यांनी केले, तर आभार महेंद्र मातोंडकर यांनी मानले. आनंदयात्री महेश राऊळ, संजय पाटील, किरण राऊळ, सानिया वराडकर यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले.

konkansamwad 
