वेंगुर्लेत चित्रकला-शिल्पकला नोंद लेखन कार्यशाळा......आनंदयात्री वाङ्मय मंडळ आणि विश्वकोष निर्मिती मंडळ यांचे आयोजन
वेंगुर्ला
अभिजात भाषा दिन सप्ताहाच्या औचित्याने वेंगुर्ल्यात आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ला आणि विश्वकोष निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला आणि शिल्पकला नोंद लेखन या दोन कलाविषयांवर केंद्रित ही कार्यशाळा आगामी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडणार आहे.या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ कलाकृतींच्या अभिव्यक्तीपुरते न राहता चित्रकला व शिल्पकला विषयक विश्वकोषीय नोंदी कशाप्रकारे लिहाव्यात याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन तज्ज्ञ संपादकांकडून करण्यात येणार आहे. यामुळे कलाक्षेत्रातील रसिकांना लेखनकलेची गोडी लागून ते थेट विश्वकोष निर्मितीत योगदान देऊ शकतील, ही मोठी संधी उपलब्ध होत आहे.
या कार्यशाळेमुळे सिंधुदुर्गातील कलाकारांना जागतिक स्तरावर मान्यता पावणाऱ्या विश्वकोष निर्मिती मंडळाशी जोडले जाण्याची नवी दिशा मिळणार आहे. स्थानिक कलाप्रेमी, विद्यार्थी तसेच व्यावसायिक कलाकारांना आपली प्रतिभा समाजोपयोगी कार्याशी निगडीत करण्याचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे.आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षा साहित्यिका वृंदा कांबळी आणि सचिव प्रा. डॉ. सचिन परूळकर यांनी कार्यशाळेबाबत माहिती देताना सांगितले की, "चित्रकला आणि शिल्पकला यांसारख्या दृश्य कलेचे विश्वकोषात सविस्तर दस्तऐवजीकरण होणे गरजेचे आहे. या माध्यमातून कलाकारांचे योगदान पिढ्यानपिढ्या जतन राहील. कार्यशाळेत सहभागी होऊन कलाप्रेमींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा."कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना बस प्रवासासाठी तिकीटाचा भत्ता, उपस्थितीचे प्रमाणपत्र, तसेच चहा-नाश्ता व दुपारचे जेवण आयोजकांकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे दूरवरून येणाऱ्यांनाही सहजतेने या उपक्रमात सहभागी होता येईल.स्थानिक पातळीवर इतक्या मोठ्या स्वरूपाची आणि शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाची कार्यशाळा प्रथमच आयोजित होत असल्याने वेंगुर्ला आणि परिसरातील कलाकारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

konkansamwad 
