वेंगुर्ला-मोचेमाड पुलाचा संरक्षक कठडा कोसळला

वेंगुर्ला-मोचेमाड पुलाचा संरक्षक कठडा कोसळला

 

वेंगुर्ला
 

         वेंगुर्ला-पणजी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा बॅरिस्टर नाथ पै पूल म्हणजेच मोचेमाड पुलाचा कठडा कोसळला आहे. पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.यामुळे  वाहतूक करणाऱ्या प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जीर्ण अवस्थेतील या पुलाचे कठडे कधीही कोसळू शकतात त्यात पुलाच्या कठड्याचा काही भाग कोसळल्यामुळे पुलाची पुनर्बांधणी गरजेची असल्याचे दिसून येते. हा कठडा कोणी तोडला का? कोणते वाहन त्याला धडकले का? वर्षानुवर्षे डागडुजी न झाल्यामुळे ते जीर्ण झाले आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्यामुळे कठडा कोसळण्याचे अधिकृत कारण अद्याप समजू शकले नाही. पावसाळा असल्यामुळे या पुलावर मासे पकडण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजेरी लावतात तसेच येणार-जाणारे पर्यटक या पुलावर फोटो काढण्यासाठी आवर्जून थांबतात दरम्यान कोसळलेल्या कठड्या शेजारी कोणतेही फलक अथवा सूचनापाटी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आली नाहीये. पुलावर दिवस - रात्र अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते.रात्री पुलावर अंधार असल्यामुळे यात कुणाचाही तोल जाऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच मासे पकडायला येणाऱ्यांसाठी देखील हा कठडा धोक्याची घंटी आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कोसळलेल्या कठड्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून तो पूर्ववत करावा अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून जोर धरत आहे.