मालवण समुद्रकिनारी आढळले दुर्मिळ लोगरहेड समुद्री कासव

मालवण समुद्रकिनारी आढळले दुर्मिळ लोगरहेड समुद्री कासव

 

मालवण


 

   मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांमध्ये किनाऱ्यालगत जाळ्यामध्ये कासव अडकलेल्या स्थितीत असल्याचे संतोष खवणेकर, प्रविण (बाळा) पराडकर, महेंद्र कुबल, नारायण (दादू) लोणे या पारंपरिक मच्छिमारांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता पराडकर व कुबल यांनी पाण्यात जाऊन ते कासव जाळ्यासहीत उचलून किनाऱ्यावर आणले. त्यानंतर संतोष खवणेकर यांनी चाकूच्या साहाय्याने दोरखंड कापून ते कासव जाळ्यामधून सोडविले व नारायण लोणे यांनी त्या कासवास सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले.त्या कासवाचा फोटो व्हिडीओ युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेचे सदस्य अक्षय रेवंडकर यास दर्शविले असता त्यांनी ते समुद्री कासव दुर्मिळ लॉगरहेड असल्याचे सांगितले. हे कासव IUCN च्या यादीमध्ये असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे. तसेच लॉगरहेड समुद्री कासव हे एक मोठे सागरी कासव आहे, ज्याला त्याच्या मोठ्या डोक्यामुळे हे नाव मिळाले असून हे जगातील सर्वात मोठे कठीण कवच असलेले कासव आहे. याचे डोके मोठे आणि मजबूत असते, ज्यामुळे ते शंख आणि कठीण कवच असलेल्या प्राण्यांना सहजपणे खाऊ शकते अशी माहिती रेवंडकर यांनी दिली.