विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मालामाल; बीसीसीआयकडून तब्बल १२५ कोटींचे बक्षीस जाहीर.

विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मालामाल; बीसीसीआयकडून तब्बल १२५ कोटींचे बक्षीस जाहीर.

नवीदिल्ली.

  टी 20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं इतिहास रचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) भारतीय संघाबाबत मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रविवारी विजेत्या संघासाठी १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. भारताच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये योगदान दिल्याबद्दल खेळाडू आणि सर्व कोचिंग स्टाफचे अभिनंदन केले.
    बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले कि, भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन! जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि इतर खेळाडूंच्या मदतीने त्यांनी १.४ अब्ज भारतीयांची स्वप्ने आणि अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.' संघाने आपल्या सातत्यपूर्ण चमकदार कामगिरीने आपल्या टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. संघाचा प्रवास एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही आणि आज ते दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाले आहेत.