‘दिलखुलास’ कार्यक्रमात अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे यांची मुलाखत.
मुंबई.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व’ याविषयावर कोकण विभागीय कृषी सह संचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. त्यादृष्टीने केंद्र आणि राज्यस्तरावर कृषी विभागामार्फत शाश्वत उत्पादन, भरड धान्यांच्या अधिक वापरासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, बाजार आणि मूल्य साखळी तसेच संशोधन विकास विषयक उपक्रम विकसित करणे, जागतिक पातळीवर भरड धान्यांच्या उत्पादनात वाढ, आंतरपीक पद्धतीचा वापर तसेच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व सर्वसामान्य जनतेला समजावे यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत, याबाबत कृषी अधिकारी श्री. ताटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ताटे यांची मुलाखत शुक्रवार दि. 1, शनिवार दि. 2, सोमवार दि. 4 आणि मंगळवार दि. 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.