देवगड समुद्रात मच्छिमार नौका बुडाली. आठ पैकी सात खलाश्यांना वाचविण्यात यश; एक खलाशी अजून बेपत्ताचं

देवगड समुद्रात मच्छिमार नौका बुडाली.   आठ पैकी सात खलाश्यांना वाचविण्यात यश; एक खलाशी अजून बेपत्ताचं

देवगड.

    देवगड समुद्रात १० वाव पाण्यात तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका बुडाली असून या नौकेवरील ८ पैकी ७ खलाश्यांना वाचविण्यात यश आले असून एक खलाशी अद्याप बेपत्ता आहे. ही घटना रविवार ३१ मार्च रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.
   या बाबत सविस्तर माहिती अशी की, देवगड बंदरातील तुषार दिगंबर पारकर यांच्या मालकीची विशाखा ही नौका मच्छीमारीसाठी रविवार ३१ मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास देवगड बंदरातून समुद्रात जाण्यासाठी निघाली होती. देवगड किल्ल्यासमोर १० वाव पाण्यात बोटीच्या तळातील जॉईंटच्या फटीमधून पाणी लागल्याने बोट बुडू लागली. बोट बुडत असल्याने बोटीवरील  मुख्य तांडेल रमेश धोंडू लाकडे (राहणार गावडे आंबेरी रत्नागिरी), दुसरे तांडेल सर्वेश सदानंद गोयनाक (राहणार गावडे आंबेरी)खलाशी प्रदीप वसंत माळी (राहणार हर्चे लांजा) अनिल शांताराम भडेकर (राहणार चाकण राजापूर) निसार अब्दुल्ला दरवेस(रा. गावखडी रत्नागिरी) जगदीश सखाराम गोटरे (राहणार साखरे राजापूर) संजय सुभाष वाईम (रा.चाकण राजापूर) व नितीन जयवंत कणेरकर (रा. कणेरे राजापूर)यांनी पाण्याची कॅने रिकामी करून जीव वाचविण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उडी मारली. याचं दरम्यान मच्छीमारीसाठी गेलेल्या अनंत नारकर यांच्या इंद्रायणी या नौकेवरील तांडेल व खलाशी यांनी बुडत असलेल्या बोटीवरील खलाशी यांना वाचविले. मात्र या बोटीवरील नितीन जयवंत कणेरकर ४३ राहणार कणेरे राजापूर याच्या हातातील कॅन सुटून गेल्याने तो पाण्यात बेपत्ता झाला. या घटनेची माहिती मालक तुषार पारकर व देवगड पोलीस यांना मिळतात स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने व पोलीस गस्तीनौका पंचगंगा यांच्या सहाय्याने बेपत्ता खलाश्याची शोध मोहीम दिवसभर सुरू होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो मिळालेला नव्हता.या दुर्घटनेत संपूर्ण बोट जाळ्यांसहित नौकेला जलसमाधी मिळाल्याने नौका मालक तुषार पारकर यांचे सुमारे २० लाखाचे नुकसान झाले आहे.पोलिसांच्या पंचगंगा या गस्तीनौकेतून पीएसआय सोलकर, तांडेल, दरवेश, शकील अहमद, एएसआय चंदन शिवे, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र मुंबरकर, यांनी शोध मोहीम राबविली. याबाबतच्या अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.