भाजपची आज दिल्लीत हायव्होल्टेज बैठक; मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय होण्याची शक्यता. केंद्रातील सरकार स्थापनेनंतर महाराष्ट्रातील घडामोडींना वेग.

भाजपची आज दिल्लीत हायव्होल्टेज बैठक; मंत्रीमंडळ विस्ताराबाबत निर्णय होण्याची शक्यता.  केंद्रातील सरकार स्थापनेनंतर महाराष्ट्रातील घडामोडींना वेग.

मुंबई.

  भारतीय जनता पक्षाची कोअर कमिटीची बैठक दिल्लीत आज मंगळवारी सायंकाळी होणार असून, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मनगुंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. फडणवीस यांचा राजीनामा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या विस्तारामध्ये पुण्याला आणखी एखादे मंत्रिपद मिळू शकते.
   केंद्रातील सरकार स्थापनेनंतर महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना अनुक्रमे प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून सोमवारी नियुक्त केले. त्यानंतर दिल्लीत लगेचच बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. फडणवीस, पाटील; तसेच इतर नेते मंगळवारी दुपारी दिल्लीला रवाना होतील. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीस माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामास्त्र उगारत पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या बड्या नेत्यांच्या जोडीला ‘तोंड’ देण्यासाठी महायुतीतील सर्वाधिक मोठा घटक पक्ष असलेल्या भाजपचा दमदार नेत्याची मंत्रिमंडळात आवश्यकता आहे. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये, अशी भूमिका स्थानिक नेत्यांकडून घेण्यात आली आहे. दिल्लीतील बैठकीत त्यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयशाचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार; तसेच महामंडळाचे वाटप करण्यासाठी सरकारवर दबाव आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असल्यास खातेवाटप, सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमधील फेरबदल यावरही चर्चा दिल्लीतील बैठकीत अपेक्षित आहे.