स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र येऊन काम करा आणि विजय संपादन करा - अरुण दुधवडकर

सावंतवाडी
पक्ष ज्यांना उमेदवारी देते ते निवडून आले तरी आणि पराभूत झाले तरीही पक्ष संघटनेकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे यापुढे पदाधिकाऱ्यांना बळ देण्याकरिता थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सावंतवाडी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घालून देणार आहे. होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम करा आणि विजय संपादन करा असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेते आणि जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले. सावंतवाडी माजगाव येथील सिद्धिविनायक सभागृहामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमात दुधवडकर बोलत होते. सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक यांनी ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख कालिदास कांदळगावकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी तालुकाप्रमुख राजू नाईक, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, जिल्हा महिला संघटिका श्रेया परब, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, सावंतवाडी तालुका महिला संघटक भारती कासार, नम्रता झारापकर, शहर महिला संघटक श्रुतिका दळवी, सावंतवाडी शहर प्रमुख शैलेश गवंडळकर आदींसह विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुखांची उपस्थिती होती.ते पुढे म्हणाले, लोकसभेत आणि विधानसभेत झालेला पराभव म्हणजे सगळे संपले असे नव्हे. शिवसेनेने असे अनेक पराभव पचवले आहेत. विजयही मिळवलेले आहेत. त्यामुळे मतभेद गाडून पक्षप्रमुखांना आपली ताकद दाखवून द्या. कट्टर शिवसैनिकाने आता एकत्र येऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका जिंकाव्यात असे आवाहन त्यांनी केले.मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीसंदर्भात आत्मचिंतन आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मिनी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवणे आणि कार्यकर्त्यात उर्जा वाढवावी यासाठी या शिबिरात बोलणे झाले. आदर्श शिवसैनिक कसा असावा याबाबतचे मार्गदर्शन आपल्या प्रास्ताविकात तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक यांनी केले.निवडणुका आल्या की कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. लोकसभेपर्यत उत्साह होता मात्र त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तसा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसला नाही त्यामुळे ही आलेली मरगळ दूर करावी लागेल. विधानसभा निवडणूकीत पराभवाचा सामना का करावा लागला. याचे आत्मचिंतन होण्याची गरज यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जे उमेदवार दिले त्यापैकी कोण राहिलेत ? कोणी नाही. कार्यकर्ते एकाकी पडले असल्याची भावना यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यानी व्यक्त केली.निष्ठावंत पदाधिकारी कुठेही गेलेले नाही परिस्थिती जरी बिकट असली तरी संघटनेने कार्यकर्त्याला बळ द्यायला हवे आणि यापुढे विविध विधायक कार्यक्रम घेणे सुरुच ठेवावे असे मत विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केले. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी संघटनेचे नुकसान टाळण्यासाठी नवे नेतृत्व निर्माण करुन जिल्हा परिषद मतदार संघ निवडणूक लढू आणि जिंकू ही. काही वेळा उमेदवारांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे कार्यकर्ते नाराज होत असल्याबद्दलची भावना त्यांनी व्यक्त केली.