गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. एकूण ९१ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
सावंतवाडी.
इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे तब्बल ११०० बॉक्स जप्त केले असून बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी अरुण लक्ष्मण मिठबावकर (४८, रा. बांदिवडे, ता. मालवण) याला ताब्यात घेतले आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनर (केए ३७ ए २८३९) जप्त करण्यात आला. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्यावर आज पहाटे ५.५० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, एक्साईजच्या इन्सुली चेकपोस्ट समोरील महामार्गावर गोव्यातून येणारा कंटेनर तपासणीसाठी थांबविण्यात आला.कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारूचे तब्बल ११०० कागदी बॉक्स आढळून आले. त्यात एकूण ५२ हजार ८०० सीलबंद बाटल्या होत्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत एकूण ७९ लाख २० हजार रुपये आणि १२ लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण ९१ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय मोहिते, तानाजी पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रदीप रासकर, गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रणजीत शिंदे, जवान दीपक वायदंडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक संजय मोहिते करीत आहेत.