आयुष्यमान भारत योजनेत जिल्हा प्रथम क्रमांकावर : डॉ ओमप्रकाश शेटे.

आयुष्यमान भारत योजनेत जिल्हा प्रथम क्रमांकावर : डॉ ओमप्रकाश शेटे.

सिंधुदुर्ग.

  महात्मा फुले जन आरोग्य योजनाचा लाभ आता आयुष्मान योजनेमधूनच एकत्रितपणे दिला जाणार आहे.आयुष्यमान योजना राबविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच हजार लोकांनी सुमरे साडेपाच कोटी रुपयांचा लाभ घेतला आहे. आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रोत्सवात प्रसादरूपी आयुष्यमानचे कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
   आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या सोबत आयुष्यमान योजनेचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी या योजनेचे जिल्हा सन्मवयक अभय देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी उपस्थित होत्या.
   आयुष्यमान भारत मिशनचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू आहे.आयुष्यमान कार्ड काढण्याचे काम राज्यात 39 टक्के पर्यत झालेले आहे. राज्यात या योजनेअंतर्गत 60 टक्के काम झालेला  सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शंभर टक्के आयुषमान कार्ड काढून देणारा जिल्हा होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी कार्ड काढून देण्यासाठी जास्तीत जास्त मदत केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.  विशेषतः आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रोत्सवात प्रसादरूपी आयुष्यमानचे कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती डॉ शेटे यांनी दिली .
आयुष्यमान भारत योजनेचा लाभही चांगल्या प्रकारे घेतला जात आहे.  जिल्ह्यात 6 लाख 62 हजार  लोकांचे आयुषमान कार्डचे उद्दिष्ट्य आहे.  आतापर्यत 3 लाख 97 हजार 445 लोकांचे कार्ड काढण्यात आले आहेत. या अंतर्गत आतापर्यत 5 हजार  लोकांनी 5 कोटी 63 लाखांचा लाभ आयुष्यमान योजनेखाली घेतला आहे असून जिल्ह्यात सक्षमपणे राबविल्या जाणाऱ्या योजनेचा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविणार  असल्याचेही ते म्हणाले.
   आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळण्याच्या योजनेमध्ये केशरी,व पिवळ्या रेशनकार्ड धारकांचाच समावेश होता आता पांढऱ्या रेशनकार्ड धारकांचा समावेश केला आहे त्यामुळे पांढऱ्या रेशनकार्ड धरकांनाही आयुष्यमान मिशन योजनेतर्गत पाच लाखापर्यतचे मोफत उपचार घेता येणार आहेत. शासकीय मेडिकल कॉलेज मध्येही या योजनेचा लाभ घेता येणार आहे . जिल्ह्यात 11 ठिकाणी आयुष्यमानचा लाभ घेण्याची सुविधा सुरु केली असून त्यात 7 खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. आता बेळगाव येथील केएलई रुग्णालयातही आयुष्यमान योजनाचा लाभ घेता येणार आहे.
  आज आयुष्यमान मिशन योजनेसह इतर योजनांचा  आढावा आरोग्य अधिकाऱ्यां सोबत  घेण्यात आला. त्यामध्ये काही सूचना आल्या आहेत, तसेंच खाजगी डॉक्टर यांच्यासोबतही चर्चा झाली त्यानीही काही सूचना केल्या. या सर्व सूचनांचा विचार करून लोकांना एक परिपूर्ण , त्रुटी नसलेली योजना राबविण्यात येईल. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी  एक महत्वाची सूचना केली ती म्हणजे 3 मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे त्यासोबतच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्याची मोहीम राबविण्यात यावी अशी सूचना त्यांनी केल्याचेही डॉ शेटे यांनी सांगितले.