क्रीडा विद्यापीठ अधिनियमासाठी २० डिसेंबरपर्यंत अभिप्राय, सूचना पाठविण्याचे आवाहन.

क्रीडा विद्यापीठ अधिनियमासाठी २० डिसेंबरपर्यंत अभिप्राय, सूचना पाठविण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

   छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा विद्यापीठाचा अधिनियम तयार करण्यासाठी  क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ, क्रीडा संस्था, एकविध क्रीडा संघटना, खेळाडू, प्रशिक्षक यांनी त्यांचे अभिप्राय,सूचना  dsysdesk11@gmail.com  या ईमेलवर दि. 20 डिसेंबर 2023 पर्यंत पाठवण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा, सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे.
   क्रीडा क्षेत्राचा शाश्वत विकासासाठी पुरक घटकांचा सर्वंकष विचार करणे आवश्यक असून जागतिक स्तरावर क्रीडा विषयक संशोधने, प्रगती पाहता नियोजनबध्द क्रीडाविकासाचे कार्य हाती घेणे आवश्यक आहे. क्रीडा विषयक कामगिरी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन नोकरीच्या संधी, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा  वैद्यकशास्त्र, तरुण वर्गास क्रीडाक्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे. राज्यात क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू निर्माण व्हावेत, क्रीडाक्षेत्रासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.
   क्रीडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अधिनियम तयार करण्यासाठी डॉ. माणिकराव साळूंखे, माजी कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा विद्यापीठाचा अधिनियम तयार करणे, क्रीडा विद्यापीठ अनुषंगिक बाबींचा शिफारस करणे, क्रीडा विद्यापीठ अंतर्गत अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शिफारस करणे अशी समितीची कार्यकक्षा आहे.