मिलेट च्या वापरातून खाद्य पदार्थाचा प्रचार व प्रसार करण्यासाठीचा मेळावा संपन्न.

सिंधुदुर्ग.
ईट राइट इंडिया या उपक्रमांतर्गत भरड धान्य किंवा तृणधान्य (मिलेट) यांचे दैनंदिन आहारातील महत्व व त्यांचे शरीराला होणारे फायदे लक्षात घेता. मिलेट चा प्रचार व प्रसार करण्यासाठीचा मेळावा कणकवली येथे संपन्न झाला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मो.शं. केंबळकर यांनी दिली.
तृणधान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधून अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग कार्यालय, रिगल कॉलेज, जानवली, ता. कणकवली आणि योगतज्ञ गावडे काका यांच्या ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथे दि. ८ नोव्हेंबरला मिलेट मेळा व योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये FSSAI, नवी दिल्ली यांनी देशपातळीवर सुरू केलेल्या ईट राईट इंडीया या उपक्रमाअंतर्गत भरड धान्य किंवा तृणधान्य (मिलेट) यांचे दैनदिन आहारातील महत्व व त्यांचे शरीराला होणारे फायदे यासंदर्भात रिगल कॉलेज मधील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व भरडधान्य (मिलेट) चा वापर आपल्या दैनंदिन आहारामध्ये वाढावा तसेच सदर मिलेटच्या वापराबाबत व्यापक प्रचार व प्रसार व्हावा, या हेतुने विद्यार्थ्यांकडून मिलेटचा वापर करून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचा मेळावा भरवण्यात आला होता.
मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) - मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त (औषधे) - मिलिंद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके, रिगल कॉलेज च्या प्राचार्या तृप्ती मोंडकर, योगतज्ञ - गावडे काका, योगशिक्षक आनंद सावंत, योगशिक्षिका मारिया डिसोजा यांनी विद्यार्थ्यांना तृणधान्याचे दैनंदिन आहारातील महत्व व योगाचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे शरीराला होणारे फायदे याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.