समाजातील प्रत्येक घटकाने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सहभागी व्हावे : रवींद्र खानविलकर. कणकवली येथे जादूटोणा विरोधी कार्यशाळा संपन्न.

समाजातील प्रत्येक घटकाने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सहभागी व्हावे : रवींद्र खानविलकर.  कणकवली येथे जादूटोणा विरोधी कार्यशाळा संपन्न.

कणकवली.

   देव व धर्माला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध नाही. मात्र, देव व धर्माच्या नावाखाली शोषण व लुबाडणाऱ्यांविरोधात आमच्या संघटनेचा लढा सुरु आहे. समाजातल्या अंधश्रद्धा प्रबोधनाद्वारे दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि माणुसकीपूर्ण स्वातंत्र्य, समता, बंधुता मानणारा व स्वीकारणारा आनंदी समाज निर्माण करणे हे समितीचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार अंमलबजावणी समिती, सिंधुदुर्ग व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात जादूटोणा विरोधी कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते झाले.
    यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव विजय चौकेकर, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजीव लिंगवत, साहस प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष रुपाली पाटील, साहित्यिक तथा डॉ. सतीश पवार, ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, दीपक जाधव, अनिल चव्हाण, यशवंत राणे, वसंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
    रुपाली पाटील म्हणाल्या, समाजात अजूनही अनिष्ट प्रथा आहेत. या प्रथा रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे. समाजातील पसरलेली अंधश्रद्धा व त्याच्या नावाखाली शोषण करणाऱ्या व लुबाडणाऱ्यांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लढा असून त्याचे हे कार्य अतुलनीय आहे. समितीच्या या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी करताना अंधश्रद्धेबाबत त्यांना आलेले अनुभव त्यांनी शेअर केले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य कौतुकास्पद असून समितीच्या तरुण पिढीने कनेक्ट व्हावे, अशी अपेक्षा सतीश पवार यांनी व्यक्त केली. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत समाजातील प्रत्येक घटकांनी सामील व्हावे असे आवाहन वसंत जाधव यांनी केले. जादूटोणाविरोधी कार्यशाळेला शासनाचे औपाचारिक सहकार्य असल्याबद्दल विजय शेट्टी नाराजी व्यक्त करत सामाजातील अंधश्रद्धाचे उच्चाटन करायाचे असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सहभागी होऊन समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अंधश्रद्धा निर्मूलन समिती ४० वर्षे कशाप्रकारे काम करत याची माहिती प्रास्ताविकेत विजय चौकेकर यांनी दिली.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद धामापूरकर यांनी केले.आभार महेंद्र पवार यांनी मानले.यावेळी नागरिक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य उपस्थित होते.