जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी यांची आज आकाशवाणीवरुन मुलाखत.
सिंधुदुर्ग.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या ४० वर्षाच्या वाटचालीत दि. २७ जुलै २०२३ रोजी ५००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार पाडला आहे. सहकार बँकींग क्षेत्रात राज्यामध्ये या बँकेच्या कामकाजाची दखल घेतली गेली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण विकासामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा आहे. या योगदानाची दखल घेत आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राने सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मान. श्री. मनिष दळवी यांना निमंत्रित करुन त्यांची मुलाखत घेतली आहे.
सदरची मुलाखत आज गुरुवार, दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी सायं. ५.३० वाजता आकाशवाणी - सिंधुदुर्गनगरी (ओरोस) केंद्रावर १०३.६ Mhz या एफ्एम् रेडीओ फ्रीक्वेन्सीवर प्रसारीत होणार आहे. तरी जिल्हावासियांनी या मुलाखतीतील विचार ऐकावेत असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे यांनी केले आहे.
या मुलाखतीत सिंधुदुर्ग बँकेने जिल्ह्यातील तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करुन देण्यात आला व त्यासाठी बँकेने कोणत्या योजना कार्यान्वीत केल्या याबाबतची चर्चा घडवून आणली आहे. अशा प्रकारे प्रथमच सिंधुदुर्ग बँकेची दखल आकाशवाणी केंद्राने घेतली असून हा मान जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांना मिळाला आहे.