चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरला अपघात

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरला अपघात

 

दोडामार्ग

 

        चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट संरक्षक कठड्याला धडकून अपघात घडला. ही घटना  तिलारी घाटातील तीव्र वळणावर घडली. सुदैवाने तो खोल दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. मात्र या घटनेमुळे घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक कोलमडून पडली आणि प्रवाशांना तब्बल तासभर त्रास सहन करावा लागला.
         घाटमाथ्यावरून गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तिलारी घाट उतरत होता. घाटातील तीव्र उताराच्या 'यु' टर्नवर आला असताना चालकाचा अंदाज चुकला. क्षणातच कंटेनर नियंत्रणाबाहेर गेला आणि थेट संरक्षक कठड्याला जाऊन आदळला. यावेळी तो खोलदरीत कोसळण्यापासून  बचावला. अपघातानंतर चालकाने वाहन मागे घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र प्रयत्न निष्फळ ठरले.कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी आडवा अडकून बसल्याने घाटमार्ग पूर्णपणे बंद झाला. दुचाकीलाही वाट मिळाली नाही. काही वेळातच दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवासी आणि वाहनचालक यांचा संयम सुटत होता, अनेकांनी संताप व्यक्त केला. चंदगड तालुक्यातील अनेक युवक गोव्यात नोकरीनिमित्त असतात. अनेक जण घरी परतत असताना या कोंडीत अडकले. अखेर स्थानिकांच्या मदतीने आणि प्रयत्नांनंतर, तब्बल तासाभरानंतर कंटेनर बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरू झाली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.